हायड्रो गांजाची तस्करी करणार्‍या दोन विद्यार्थ्यांना अटक

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : विदेशी हायड्रो गांजाची ऑनलाईन तस्करी करणार्‍या हायप्रोफाइल रॅकेटचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. दोन महाविद्यालयीन तरुणांना अटक करून १० हजार रुपये ग्रॅम भाव असलेला सुमारे २८५ ग्रॅम हायड्रो गांजा (२८ लाख ५० हजार रुपये किंमत) जप्त केला. १० रोजी महावीर चौक (बाबा पेट्रोल पंप) भागात ही कारवाई करण्यात आली. अटकेतील दोघेही उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत. या प्रकरणात आठ आरोपींविरुद्ध क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
राजवीर चरणसिंग बिरग (२०, रा. हनुमान मंदिराजवळ, ए सेक्टर, एन ४, सिडको) आणि ओम रवींद्र शिंदे (२३, रा. शहीद भगतसिंग कॉलनी, एन ४, सिडको), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. दोघांनाही तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली, अशी माहिती पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली.
महावीर चौक परिसरात दोघेजण दुचाकीने गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची खबर गुन्हे शाखेचे अंमलदार वाडिलाल जाधव यांना मिळाली होती. त्यावरून सहायक पोलीस निरीक्षक रविकांत गच्चे, पोलीस उपनिरीक्षक जगन्नाथ मेनकुदळे, प्रवीण वाघ, अभिजित चिखलीकर, अंमलदार वाडिलाल जाधव, सुनील पाटील, संजय गावंडे, विनोद परदेशी, सुनील जाधव, विजय निकम, ओम शिंदे, दीपक शिंदे, राजाराम डाखुरे, सागर पांढरे, राजेश यदमळ, राहुल बंगाळे, अमोल मुगळे यांच्या पथकाने महावीर चौक ते लोखंडी पूल यादरम्यान सापळा रचला. आरोपी राजवीर आणि ओम हे दोघे दुचाकीने आले. पोलिसांनी लगेचच झडप मारून पकडले. 
२९ लाखांचा ऐवज लंपास
आरोपींच्या ताब्यातून २८५ ग्रॅम हायड्रो गांजा, दुचाकी, डिजिटल वजन काटा, दोन मोबाइल, असा २९ लाख ५१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.